*🔸महात्मा गांधी.🔸*
*मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी
३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.
महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला
स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण
जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान
आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे
भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा
त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे
जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय
अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.*
*असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम
दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार
यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची
सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव,
अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू
केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते
आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत
चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी
लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब
दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत
छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण
आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.*
*गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही
याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या
भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन
चर्चिल यांनी १९३० साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली.
स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा
अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास
केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी
हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.*
*गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर
शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी
तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद
गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या
पत्नी होत्या. आधीच्या
तीन पत्नी प्रसूतिदरम्यान
मृत पावल्या होत्या. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या
पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा
या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. आईमुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा
प्रभाव होता. प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा
मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या दोन कथांमुळे
त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात "त्याने मला झपाटले आणि मी
अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन" गांधीच्या सत्य आणि प्रेम
या दैवी गुणाशी झालेल्या स्व:ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो.*
*इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या
बरोबर बालविवाह झाला. त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले
जाई. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच
होत्या. या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या
दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते, "आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत
नसल्यामुळे लग्न म्हणजे आमचासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाइकांबरोबर
खेळणे" हेच होते. इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना
पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास
झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल,
इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास.*
*त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते
एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढीलप्रमाणे होता
- "इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा. वर्तणूक अतिशय चांगली,
हस्ताक्षर खराब " ते मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील शामळदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच
पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेबद्दल
ते नाखूश होते.*
*बॅरिस्टर.*
*शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये
लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या
गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला
जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून
दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी
जेवणाची चव त्यांना आवडली नाही. आणि लंडनमधील त्याकाळी दुर्मीळ असलेली एक भारतीय खानावळ
सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा
प्रयत्न केला. उदाहरणार्थ
नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या
अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया
थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि
भाषांतरित आणि मूळ भगवद्गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक
गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले.*
*इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत
येऊन वकिली करू लागले. १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर
कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहान्त झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने
ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची
त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यांसाठी
मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु
एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. १८९३
मध्ये त्यानी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ (दक्षिण आफ्रिका) येथील दादा
अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला.*
*दक्षिण आफ्रिका.*
*गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे
राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील
भारतीयांचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब
हिंदू गिरमिट्यानी(?) गांधीना नोकरी दिली. 'भारतीयत्व' सर्व धर्म आणि जातींमध्ये उतरले
आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधीनी या सर्वाना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या
बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण सांधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता, आणि हा
विश्वास घेऊन ते भारतात आले. येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला.*
*दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकालांगाची ओळख झाली. भारतीय धर्म
आणि संस्कृती यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना
जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास
भारत समजला असे ते मानू लागले.*
*दक्षिण आफ्रिकेत गांधीना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे
लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकिट
असतांनासुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या
डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीमधून ढकलून
देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. (७ जून १८९३).
गांधीनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू
शकले असते. पण सूडभावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक
व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता.*
*पुढे एकदा, प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले.
पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून
देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना
त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या
आयुष्याला कलाटणी देण्याऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील
स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास
सुरुवात केली. अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर
गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास
सुरुवात केली.*
*तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता,
या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील
वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले, तरी यामुळे
भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इ.स. १८९४
मध्ये नाताळ भारतीय कॉंग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या
भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. इ.स. १८९७ मध्ये काही काळाच्या
भारतातील वास्तव्यानंतर दरबानमध्ये उतरत असताना काही गोऱ्या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर
हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ पोलीस
अधीक्षकाच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत
त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास
नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते.*
*इ.स. १९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार
तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी
बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या ११ सप्टेंबर ला, गांधींनी, पहिल्यांदाच आपल्या
अजूनही विकसित होत असलेल्या असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला
आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास
सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या
आवाहनाला साद दिली आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे, नोंदणी
करण्यास नकार दिल्यामुळे, नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील
झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला, चाबकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही
खाल्या. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला तरी पण या अहिंसक
चळवळीची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ
असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तिआन स्मट्स याला भाग पडले. शांततामय मार्गाने
निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे
लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना
या संघर्षादरम्यान परिपक्व झाली.*
*१९०६ मध्ये इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांच्या
बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहित
केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांच्या पाठिंबा
देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यानी केला. ब्रिटिशानी गांधींची ही मागणी मान्य केली.
आणि २० जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी
स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली
होती. दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले. या अनुभवातून ते असे शिकले
की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशाजनक
आहे - त्यानी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अश्या अहिंसात्मक पद्धतीनेच
करता येईल. नंतर जेव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेव्हा गांधीना राष्ट्रीय
नायक म्हणून विविध स्मारकांत घोषित करण्यात आले.*
*स्वातंत्र्यसंग्राम.*
*इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी,
थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या
अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना
गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय
कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये
राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून
ओळखले जातात. गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला,
आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर
ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.*
*गांधीनी १९२० मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर
मागण्यांमध्ये सतत वाढ करत करत (काही ठिकाणी थांबत आणि तडजोड करत) २६ जानेवारी १९३०
कॉंग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि
कॉंग्रेसने १९३०मध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊ पर्यंत ब्रिटिशांना हे ओळखता आले
नाही. १९३९च्या सप्टेंबर मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता व्हाईसरॉयने जेव्हा जर्मनीविरुद्ध
युद्ध जाहीर केले तेंव्हा गांधीनी आणि कॉंग्रेसने ब्रिटिश सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
गांधीनी १९४२मध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटिश सरकारने प्रतिसाद
म्हणून त्यांना आणि लाखो कॉंग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबेपर्यंत तणाव वाढतच गेला.
दरम्यान मुस्लीम लीगने ब्रिटन ला सहकार्य केले, आणि गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून
मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची, पाकिस्तानची मागणी केली. १९४७ मध्ये ब्रिटिशानी
भूमीची फाळणी केली आणि गांधीनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे
स्वातंत्र्य मिळवले.*
*३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत
असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा
एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने
महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.[१७] त्याच्या
मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. गोडसे
आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले.
त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर
’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची
सत्यासत्यता वादग्रस्त आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून
देशाला संबोधित केले:*
*"माझ्या मित्र आणि सहकाऱ्यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला
आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि
कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणत असू,
आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल, पण आपण त्यांना आता बघू शकणार
नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. (संकटांमध्ये) त्यांचा सल्ला घ्यायला
आपण आता धावत जाऊ शकणार नाही. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार
नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यवधी लोकांसाठीसुद्धा."*
*गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली
वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ ला
अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले. पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये
तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बॅंकेमधील लॉकरमध्ये
सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. ३० जानेवारीला
त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापात्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केले.
हे पात्र एका दुबईमधील व्यापाऱ्याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते.
अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे (जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या
दरम्यान बंदिवासात होते) आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक
श्राइन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी
वापरल्या जाऊ शकतात. पण ते पात्र तिथून काढून घेतल्यास तो मठ बंद पडेल या भीतीने गांधीजींचे
वंशज ते रक्षापात्र तिथून काढून घेऊ इच्छित नाहीत.*
*स्त्रोत: विकिपीडिया.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄